Tuesday, September 22, 2009

ओ माय लव्ह... गणेशा!

गणपती दर्शनाच्या लाइनमध्ये अनेकांना त्यांची लाइफलाइन सापडते. विसर्जनाच्या मिरवणुकीतही अनेकांचं सूत जुळतं. बाप्पा पावला, तर पुढच्या वर्षी हे दोघं त्याच गणपतीला जोडीने जातात.

सर्वांच्या लाडक्या गणेशाचा फेस्टिव्हल नुकताच धूमधडाक्यात साजरा झाला. पूर्वी गणेशोत्सव होता... हल्ली त्याचाच फेस्टिव्हल बनलाय. पण गणेशोत्सव असो, नाहीतर गणेशा फेस्टिव्हल, प्रेमी कपल्सना काय फरक पडतोय? या काळातील रस्त्यावरची वाढलेली गर्दी, दर्शनासाठीच्या लांबसडक रांगा आणि वाजतगाजत निघालेल्या विसर्जनाच्या मिरवणुका प्रेमीजनांसाठी नेहमीच राजमार्ग ठरत आल्या आहेत.

पूर्वी एका रात्रीत परळ-लालबागचे सगळे गणपती पाहून व्हायचे. आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीच सहा-सात तास रांगेत खचीर् पडतात. अरे, मग उलट बरंय ना. रात्री आमचा ग्रुप गणपती बघायला जातोय, असं घरी सांगून आधी एकदाच पार्टनरला भेटायचा चान्स मिळायचा. गर्दीमुळे हीच संधी आता दोन-तीनदा मिळते. फ्रेण्ड्ससोबत जातोय, असं सांगून जोड्याने बाप्पाच्या दर्शनाला आलेली कपल्स गणेशगल्ली किंवा लालबागच्या राजाच्या लायनीत पावलापावलावर दिसतात. हातात एक जास्वंदीच्या फुलांचा हार किंवा नारळ, एवढ्या भांडवलावर लाइनीत उभं राहायचं. शक्यतो आपल्या पुढे आणि मागे फॅमिली क्राऊड आहे, याची खात्री करून घ्यायची. टारगट, पोरापोरांचा ग्रुप असेल तर तिथून न चुकता कलटी मारायची. पोरापोरींचा एकत्र ग्रुप असेल तर धम्माल! त्यांच्याशी जुजबी ओळख करून घ्यायची. मोबाइलच्या कॅमे-यातून त्या ग्रुपसोबत फोटो काढून घ्यायचे आणि घरी तेच फोटो दाखवून, आमच्या ग्रुपने काय सॉल्लिड मज्जा केली याचे किस्से रंगवून सांगायचे... व्हॉट अॅन आयडिया, सरजी!

गणपती दर्शनाच्या लाइनमध्येच कधी कधी आपलीही लाइफलाइन सापडते. म्हणजे कसं... आपण आपल्या मित्रांसोबत रात्र जागवायला बाहेर पडलोय. त्याच रांगेत पुढेमागे एक छान, सुंदर पोरगी उभी आहे. नजरानजर होते... एकदा, दोनदा, पुन्हापुन्हा... रांग पुढे सरकायला लागते आणि आपल्या डोक्यातली चक्रही. कानात घुंगरं वाजायला लागतात... लव्ह अॅट फर्स्ट साइट. मंडप जवळ येईपर्यंत तोंडओळख झालेली असते. एकमेकांचा मोबाइल नंबर किंवा इमेल आयडी मिळवला की समजायचं... लाइन क्लिअर.

अनेक कपल्स खरोखरच फ्रेण्ड्ससोबत रात्री गणपती पाहायला येतात. पण गणपती दर्शनापेक्षा तिथे भरलेली जत्रा एन्जॉय करणं, हाही हेतू असतो. ग्रुपमध्ये जे कुणी सिंगल असतील त्यांनी रांगेत उभं राहायचं. किती वेळ लागेल, याचा साधारण अंदाज घ्यायचा. कपल्सनी तेवढा वेळ जत्रेत मजा करून यायची. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, वडापाववर ताव मारायचा. नाहीतर एखादा कोपरा शोधून टाइमपास करायचा. नंबर जवळ आला की, पुन्हा ग्रुपमध्ये सामील व्हायचं.

गणपती दर्शनाची ही रात्र काहींच्या आयुष्याला कलाटणी देऊन जाते. संदेश नावाच्या आपल्या एका मित्राला दोन वर्षांपूर्वी असाच अनुभव आला. तो मित्रांसोबत रात्री गणपती पाहायला गेला असताना गणेशगल्लीजवळ तीन पोरी रडत होत्या. आजूबाजूला गर्दी जमलेली. कळलं की, त्या तिघींचा छोटा भाऊ हरवलाय म्हणून. मग काय, संदेशमधला कार्यकर्ता जिवंत झाला. ग्रुपमधल्या पोरांना त्याने कामाला लावलं. कुणी गणेशगल्ली, कुणी तेजूकाया, कुणी लालबागचा राजा... कुणी रंगारी बदक चाळ गाठली. माइकवरून हरवलेल्या भावाचं नाव आणि वर्णनाची अनाऊन्समेण्ट होऊ लागली. पण तो काही सापडेना. संदेश त्या तिघींसोबत चिंचपोकळीच्या गणपतीजवळ आला. तेवढ्यात माइकवरून अनाऊन्समेंट. एका मुलाच्या तिघी मोठ्या बहिणी हरवल्या आहेत म्हणून... सर्वांनी मंडपाकडे धाव घेतली. तिथे छोटा भाऊ चहा बिस्किटं खात बसला होता. तिघींना त्यांचा धाकटा भाऊ भेटला... आणि संदेशला? गेल्याच वर्षी त्यातील मधल्या बहिणीशी संदेशचं लग्न झालं... बाप्पा पावला!

जी मजा गणपती पाहायला, त्यापेक्षा कितीतरी अधिक गणपती विसर्जनाला. विशेषत: घरगुती गणपती. चाळीतील शेजारच्या काकांचा गणपती सोडायला न चुकता येणारी त्यांची भाची किंवा कुणी नातेवाईक पोरगी. तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठीची धडपड. मोठ्या आवाजात आरती म्हणणं किंवा नाशिक बाजावर ढिनचॅक डान्स करणं. मिरवणूक ऐन रंगात आली की, तिच्या गालाला हळूच गुलाल लावणं. अर्ध्या रस्त्यात तिला गुपचूप वडापाव आणून देणं... सगळं कसं रोमांचकारी. काहीच नाहीतर शेजारून चाललेल्या दुस-या गणपतीच्या टेम्पोवर फिल्डिंग लावायची. 'कहाँ चली है गोरीयाँ... गणपती बाप्पा मोरया...'चा आवाज द्यायचा. आपल्या टेम्पोतून त्यांच्या टेम्पोमध्ये गुलाल फेकायचा, नेम धरून... पोरगी हसली की, समजायची फसली. पण कधी कधी लोच्या होतो. आपलं हे नेमबाजीचं कौशल्य नेमकं तिच्या मोठ्या भावाच्या डोळ्यात खुपतं. मग राडा हा ठरलेलाच. बाप्पाच्या कृपेने रांगेत नाहीतर मिरवणुकीत अनेकांचे दोनाचे चार हात होतात. पुढच्या वर्षी त्याच गणपतीला ही दोघं जोडीने जातात. गणपतीच्या रांगा आणि त्यात तरुणाईचं प्रमाण दरवर्षी का वाढतं, त्यामागचं खरं लॉजिक हे असं आहे.

- सुनील घुमे

Sunday, September 13, 2009

फाइव्ह हेवन्स

दादर टीटीला येऊन मंचेरजी जोशी उद्यान कुठे आहे हो? असा प्रश्न विचारला तर समोरचा माणूस तुमच्याकडे खालपासून वरपर्यंत निरखून पाहिल. मग त्यालाच फाइव्ह गार्डन्स कुठे आहे, विचारा. दुस-या मिनिटाला तुम्ही मंचेरशी जोशी उद्यान अशी पाटी असलेल्या गार्डनच्या दारात उभे असाल...

आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो पाच...

फाइव्ह गार्डन्सला गेल्यावर प्रेमी कपल्सची अवस्था ही नेमकी त्या आंधळ्यासारखीच होते. दो दिवाने इस शहर में प्रेमासाठी निवांत आशियाना शोधत असतात. मनासारखी एक धड जागा मिळेल, तर शप्पथ. ढुँढते रह जाओगे, अशी बिच्चाऱ्यांची केविलवाणी गत झालेली असते. आणि फाइव्ह गार्डन्समध्ये एक, दो, तीन नव्हे, पाच-पाच आशियाने सापडतात...

दादर टीटीला येऊन मंचेरजी जोशी उद्यान कुठे आहे हो? असा प्रश्न विचारला तर समोरचा माणूस तुमच्याकडे खालपासून वरपर्यंत निरखून पाहिल. किमान दोनवेळा. या नावाचं कुठलं उद्यान इथं आसपास आहे, हे त्याच्या गावीही नसेल. मुळात पारशी कम्युनिटीच मुंबईत इनडेंजर स्पिसीस झालेली. त्यात मंचेरजी जोशी नावाच्या कुणा पारशी सद्गृहस्थांची ओळख दादर-माटुंगाकरांना असण्याचे काही कारणच नाही... मग फाइव्ह गार्डन्स कुठे आहे, विचारा. दुस-या मिनिटाला तुम्ही मंचेरशी जोशी उद्यान अशी महापालिकेची पाटी असलेल्या गार्डनच्या दारात उभे असाल...

दादर-माटुंग्याच्या बाऊन्ड्री लाइनवर मेन रोडच्या पूर्वेला पारशी कॉलनीत असलेली ही फाइव्ह गार्डन्सची पंचरंगी दुनिया. लहानमोठ्या आकाराची पाच उद्याने याठिकाणी अगदी एकमेकांना खेटून उभी आहेत. धो धो पावसात एका छत्रीतून चाललेल्या जोडप्यासारखी... किंवा ऑलिंपिकच्या रिंगांसारखी... मेन रोडच्या गजबजाटापासून पाचच मिनिटावर हा स्पॉट आहे. पण फाइव्ह गार्डन्सचा एरिया कायम शांत असतो... पारशी कम्युनिटीसारखाच. भल्या सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी तर निर्जन म्हणावा असा शुकशुकाट इथं असतो. यामुळंच की काय ही पाच गार्डन्स म्हणजे प्रेमी कपल्सचा फेव्हरिट स्पॉट... स्वर्गच म्हणा हवं तर. इथं जो काही चिवचिवाट ऐकायला (इन फॅक्ट पाहायला) मिळतो, तो या प्रेमी मुशाफिरांचाच. गंमत म्हणजे फाइव्ह गार्डन्समध्ये जेवढी कपल्स दिवसाकाठी येतात, त्याच्या निम्मीही या पारशी कॉलनीची लोकसंख्या नाही.

सकाळी सूर्यनारायण ड्युटीवर हजर होण्याआधीच गार्डन्समधील बेंचेसचा ताबा प्रेमी जोडप्यांनी घेतलेला असतो. एकेका बेंचवर दोन-दोन कपल्स. पण कुणीही कुरकुर करत नाही. अगदी तुटका-फुटका बेंचही नाही. लेटकमर्सना हिरवळीवरच पाय दुमडून बसावं लागतं. कुणी लोखंडी रेलिंगवर बसतं, कुणी झाडाझुडपाच्या आडोशाला. इथं मोक्याची जागा मिळणं, हा दुमिर्ळ योग असतो. जे लकी असतात, त्यांचं गुटर्रगू सुरू होतं. बाकीचे कमनशिबी... उन्हाचे चटके बसू लागले की, एका जागेवरून दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे असं स्थलांतरीतांचं जीणं त्यांच्या वाट्याला येतं. अलिकडच्या काळात मॉनिर्ंग-इविनिंग वॉकवाल्यांची संख्या इथं वाढलीय. पण प्रेमीजनांनीही आपला टक्का घसरू दिलेला नाही, हे विशेष. थँक्स टू रूईया, खालसा आणि एसआयईएस कॉलेजेस... लेक्चर्स बंक करून प्रेमाची धुळाक्षरं गिरवण्यात हे कॉलेज गोअर्स जास्त धन्यता मानतात.

केवळ तरूणाईच कशाला, अगदी फोर्टी प्लस जनरेशनची जोडपीही इथं भेटतात. यापैकी अनेक लफडी या कॅटेगरीतली असतात. त्यांच्यासाठीही इथं रान मोकळंच असतं. म्हणूनच फाइव्ह गार्डन्स थोडं डाऊनमाकेर्टही झालंय. अनेक कपल्स इथं येणं टाळतात. त्यात उपटसुंभांची भर. बिनकामी, टवाळ, उनाड अशा वर्णनात फिट बसणाऱ्यांचा फाइव्ह गार्डन हा अड्डा बनला आहे. मोकळा बेंच किंवा रिकाम्या जागेवर पेपर अंथरूण आडवे झालेले लोक इथं तळ ठोकूनच असतात. प्रेमी कपल्सचा रंगलेला रोमान्स वखवखलेल्या नजरेने पाहणारे आंबटशौकिनही पुष्कळ. यांच्या जाचातून सुटका होत नाही तोच तृतीयपंथी टाळी द्यायला हजर. प्रेमीजनांच्या सुखात बिब्बा घालण्यातच त्यांचं सुख सामावलेलं असतं.

यावर काही उपाय नाही का? नक्कीच आहे. फाइव्ह गार्डन्सपासून अगदी दोनच मिनिटावर वाडिया बाग नावाचे सुंदर उद्यान आहे. वडाळ्याचं विठ्ठल मंदिर आहे ना, त्याच्या अगदी बॅक साइडला. पारशी कॉलनीचं हृदयस्थान असलेला हा छोटासा बगिचा खूपच छान आहे. सुंदर सुंदर झाडं आणि वेल मेन्टेन्ड हिरवीगार लुसलुशीत हिरवळ... नुसत्या गप्पाटप्पाच मारायच्या असतील तर डीपीवायए हायस्कूलच्या समोरच्या रोडवर असलेलं ट्रँग्युलर गार्डन हा आणखी एक चांगला पर्याय इथं आहे.

फाइव्ह गार्डन्समध्ये हरवलेली प्रायव्हसी या पारशी वस्तीत हमखास सापडते.

- सुनील घुमे

Monday, September 7, 2009

आती क्या खंडाला?

वन डे मान्सून पिकनिक म्हटलं की, पावलं वळतात ती खंडाळा-लोणावळ्याकडे. शनिवारी दिपेश आणि सोनालीही तिथं गेले होते. बाइकवरुन... जुन्या मुंबई-पुणे हायवेवरुन. एकदम टोल फ्री...

रिमझिम श्रावण सरी पडू लागल्या की, वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे... आता पाऊस एन्जॉय करायचा तर पावलं आपसूक लोणावळा-खंडाळ्याकडेच वळतात.

पण इथंच आपण फसतो राव. आपल्यासारखीच डोकॅलिटी असलेले हजारो लोक विकेण्डला आपल्या आधी तिथं पोहोचलेले असतात. च्यायला, पाय ठेवायलाही जागा नसते. लोकांची जत्रा पाहूनच निम्माअधिक मूड जातो. त्यामुळे खंडाळा-लोणावळ्यावर काट मारणं, हेच उत्तम.

परंतु गेल्या शनिवारी दिपेश आणि त्याची गर्लफ्रेंड सोनाली दोघांनी आयडिया केली. दोघंही खंडाळा-लोणावळा करुन आली. रेल्वे, बस किंवा कारनं नाही, तर बाइकवरुन. जुन्या मुंबई-पुणे हायवेवरुन. एकदम टोल फ्री...

सॅटर्डेला दुपारी अंधेरी ईस्टला सोनालीच्या ऑफिसखाली दिपेश आपली यल्लो करिश्मा घेऊन उभाच होता. पवई, तिथून ईस्टर्न एक्प्रेस हायवे. ऐरोली ब्रिजसाठी राइट टर्न, तिथून रबाळेमार्गे ते निघाले. धूम्म्म्म्म्म्म्म्म.... एनएच 4 ला जाणारा अॅप्रोच रोड कुठं बाहेर निघतो, त्यालाही धड माहित नव्हतं. पाठीवर गर्लफ्रेंड असताना रस्ता चुकलो तर काशी... पोपट होणार, असं वाटत असतानाच कधी नव्हे ते खाकी वर्दी कामी आली. ट्रॅफिक पोलिसाने एनएच 4 चा मार्ग दाखवला आणि बाइक हायवेवर आली.

खंडाळ्याला जाणारं पब्लिक मोस्टली मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेने जातं. त्यामुळे हल्ली जुना रस्ता मोकळाच असतो. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. पावसाचं नामोनिशाण नव्हतं, पण वातावरण ढगाळ होतं. बाइक चौथ्या गिअरमध्ये. 80-90 चा स्पीड. सोनालीनं मागून गच्च धरलं होतं... स्पीड वाढत होता, तशी मागची पकड आणखी घट्ट होत होती. दोनेक तासांनी खंडाळ्याचा घाट सुरु झाला. वळणावळणाच्या नागमोडी रस्त्यावरुन दिपेशने बायकिंग स्किल दाखवायला सुरुवात केली.

रस्त्यातल्या वाहनांना ओव्हरटेक करत दोघे खंडाळ्याच्या सन सेट पॉईंटवर पोहोचले, तेव्हा चार वाजले होते. तिथं टुरिस्ट आणि हॉकर्सची ही गर्दी. दोघांनी काढता पाय घेतला. लोणावळ्याच्या दिशेने. फरियास हॉटेल, कुमार रिसॉर्टस्, कामत पाहून दिपेशच्या डोक्यात किडा वळवळला. सोनाली, आजची रात्र आपण इथंच मुक्काम केला तर? काहीतरी थाप मार ना घरी... त्याने बिनधास्त मन मोकळं केलं. मागून गोड नकार आला. तुझ्याबरोबर जेवढा वेळ काढलाय ना, तेवढाच आजच्यासाठी पुरे... असं सांगताना सोनाली गालातल्या गालात हसली.

लोणावळा आलं. तिथून राइट टर्न घेऊन त्यांची करिश्मा अॅम्बी व्हॅलीच्या हिरव्यागार गालिचाच्या दिशेने धावू लागली. भुशी डॅमला थोडं थांबू, असं ठरलं होतं. पण तिथला विकेण्ड क्राऊड पाहून दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. एवढा कचरा तिथं होता की, तो मॅनेज करायला पोलिसही आले होते. पार्किंगची तर वाटच लागली होती. टपोरी, अवली पोरांचा पेयपानाचा आणि दम मारो दमचा कार्यक्रम सर्वांसमक्ष निर्विघ्नपणे सुरु होता. भुशी डॅमवर फुल्ली मारुन ते निघाले अॅम्बी व्हॅलीकडे. तिथं त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. डोंगराच्या पायथ्याशी चक्क नवा शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि डॉमिनोजचं आऊटलेट...

संध्याकाळच्या सावल्या लांबू लागल्या. आता गारवा नाही, बोचणारी थंडी अंगाचा थरकाप उडवत होती. त्यात धुक्याची भर पडली. दोघांनीही अंगात जॅकेटस् घातली. वळणावळणावर कपल्सनी लव्हर्स कॉर्नर थाटले होते. तिथलं बुकिंग आधीच फुल्ल झालेलं. कुची-कूचा खेळ रंगात आलेला. गाड्या येताना दिसल्या की, ही कपल्स सृष्टीसौंदर्य पाहण्याचं नाटक करायची, हातातला मोबाईल समोर धरुन द-याखो-यांचा फोटो काढण्याची अॅक्टिंग. गाड्या वळणावरुन दिसेनाशा झाल्या की, यांचा अर्ध्यावर मोडलेला कुची-कूचा गेम पुन्हा सुरु...

दोघं डोंगरमाथ्यावर पोहोचले. मक्याचं कणीस, भुट्टा, बटाटा आणि कांदा भजी, चहा-कॉफी, आइस्क्रीम, चिप्स, बिस्किटं... सगळे स्टॉल्स तिथं होते. सोबतीला गर्दीही होती. इथून पुढे अॅम्बी व्हॅली आणखी 9 किमीवर. या रोडवर अलिकडेच दोन नवीन रिसॉर्टस् सुरु झाले आहेत. ते कुची-कूवाल्या कपल्ससाठीच असावेत, असा समज कुणाचाही होईल. परंतु आश्चर्य म्हणजे तिथं फॅमिली क्राऊड दिसलं. अंधार पडू लागला होता. मुंबईला परतायचं होतंच. मग अॅम्बी व्हॅलीला न जाताच दिपेशने करिश्मा मागे वळवली. लोणावळा सिटीकडे. तिथं चिक्की आणि फजची भरपूर खरेदी झाली. कामतमध्ये जाऊन दोघांनी पोटोबा केला. खरं तर खंडाळा-लोणावळ्यात फिरण्यासाठी बरेच स्पॉटस् होते. पण वेळ नव्हता ना यार...

मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेने वळला. दिवसभर बाइक चालवून थकवा आलाच होता. दिपेश सोनालीच्या बिल्डिंगजवळ पोहोचला तेव्हा रात्रीचे साडेदहा झाले होते. घाईघाईत उतरुन आधाअधुरा गुडनाइट किस केला आणि ती धूम पळाली. थोडं पुढं जाऊन थांबली आणि गोड हसत बाय केलं. दिपेशचं अंग सॉलिड ठणकत होतं. प्रयत्न करुनही हसता येईना. फक्त तिची लाँग ड्राइव्हची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान त्याला होतं.

आता म्हणे त्यांनी पुढची बाइक ट्रिप प्लान केलीय ती महाबळेश्वरला... तेही पुण्याला रात्री हॉल्ट करुन..!

(वि. सू. – याठिकाणी पात्रांची नावे मुद्दाम बदलण्यात आली आहेत. वेळ, स्पॉटस्, बाइकचा मेक आणि रंग याबाबतीत कुणालाही काही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

- सुनील घुमे

Saturday, September 5, 2009

खुदा गवाह..!

प्रेमासारखं पवित्र काहीच नाही...
अगदी तसंच मंदिराचं..!
(मंदिरा बेदी नाही यार... मी ख-याखु-या मंदिराबद्दल बोलतोय. दे..ऊ...ळ!)
बिलिव्ह इट ऑर नॉट... पण एखादं सुंदर, प्रसन्न, पवित्र मंदिर किंवा दर्गा हा खरोखरच आयडियल लव्हर्स स्पॉट असतो.
निदान महालक्ष्मीच्या मंदिरात आणि हाजीअलीच्या दर्ग्यात गेल्यानंतर नक्कीच खात्री पटेल.


मंगळवारी गणपतीबाप्पा आणि शुक्रवारी संतोषीमाँ असे उपवास वगैरे करणारी तुमची ती असेल, तर नेक्स्ट टाइम तिला आवर्जून महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जा... फॉर अ चेंज... तेही आधी काहीही न सांगता. अचानक! तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक, देव मानता की नाही, या गोष्टी विसरायच्या. तिला काय आवडतं, ते सर्वात महत्त्वाचं. एकदा तिला महालक्ष्मीचे दर्शन करवून आणा, नेक्स्ट टाइम तुम्ही सांगाल तिथे यायला ती तयार होईल. एका पायावर..!

महालक्ष्मीच्या मंदिरात टॅक्सीबिक्सीने मुळीच जायचं नाही. म्हणजे तसं गेलं तर चालतं. पण मंदिरात जायचं तर चालतच जायला हवं. पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्टेशनवर उतरायचं. तिथून महालक्ष्मी रेसकोर्सच्या बाजूने जाणारा मोठ्ठा रोड सरळ मंदिराकडे जातो. फार तर अर्धा-पाऊण तास लागेल चालत हे अंतर कापायला. पण एकदम वर्थ आहे. दोन्ही बाजूला मोठ्ठाली झाडं असलेला हा रोड. दिवसा तिथं वर्दळ असते. परंतु संध्याकाळी सात-साडे सातनंतर ब-यापैकी निर्जन रस्ता. रेसकोर्सवर जॉगिंगला वगैरे जाणा-यांसाठी जो गाड्यांचा पार्किंग लॉट आहे ना... तिथून चालायचं तर वेगळ्या प्रायव्हसीची गरजच नाही. ती आपोआपच मिळते.

थोडं चालत पुढे गेल्यावर उजव्या बाजूचा रस्ता लाला कॉलेजकडे जातो. भरपूर वेळ असेल तर वाट वाकडी करायला मुळीच हरकत नाही. किंबहुना संध्याकाळी चार-पाचची वेळ असेल तर वाट वाकडी कराच तुम्ही. या शॉर्टकटने तुम्ही थेट हाजीअलीला जाणा-या मेन रोडवर येता. नेहरु तारांगण आणि हाजीअली यांच्या बरोबर मध्यावर. रस्ता क्रॉस केला की, समुद्र... इथं बसायला फारशी बेंचेस नाहीत. नशीबवान असाल, तर एखादा रिकामा बेंच मिळेल. जिनका कोई नही होता, उनका खुदा होता है... आणि ज्यांच्याकडे बेंच नाही, त्यांच्यासाठी समुद्राचा कठडा होता है... ओबडधोबड कठड्यावर बसून खळाळणा-या लाटांवर तरंगणारा हाजीअलीचा दर्गा पाहण्यात मोठीच मौज आहे. दिवस पावसाचे असतील तर तुफानी लाटा समुद्राची वेस ओलांडून फुटपाथवर येऊन फुटतात. कपड्यांवर तुषारांचा सडा पडतो. खवळलेल्या समुद्रातून हाजीअलीचा दर्गा अलगद किना-यावर वाहत येईल की काय, असा भास होतो. पण नाही. अढळ तपश्चर्येला बसलेल्या एखाद्या ऋषी-मुनीसारखा हाजीअलीचा दर्गा स्थितप्रज्ञ असतो. लाटा डोकं आपटून थकतात, पण दर्गा जागच्या जागीच.

प्रामाणिकपणे सांगायचं, तर किना-यावर बसण्यापेक्षा हाजीअलीच्या दर्ग्यात जाण्यात खरा आनंद आहे. तुम्ही कुणीही असा, दर्ग्यात जाण्यासाठी कसलाही मज्जाव नाही. फक्त शुक्रवारची नमाजींची गर्दी टाळावी इतकंच. दर्ग्यात जाणं म्हणजे समुद्राच्या पोटात शिरण्यासारखंच. भगवान श्रीराम सागरी सेतूवरुन चालत लंकेला कसा पोहोचला असेल..? हाजीअलीच्या दर्ग्यात जाणा-या दगडी रस्त्यावरुन चालताना अगदी तस्साच फिल येतो. फक्त वाटेतले भिकारी थोडा रसभंग करतात. खैरातीसाठी त्यांचा जो आटापिटा सुरु असतो, तो एकदम वाईट्ट. असं म्हणतात की, या भिका-यांकडे दिवसाकाठी हजारा-हजाराची चिल्लर जमते. आयला, सॉलिडच...
दर्ग्यातलं वातावरण तसं अपरिचित. पहिल्यांदाच गेला असाल तर गोंधळून जायला होतं. परंतु पद्धत कोणतीही असो, मनातली श्रद्धा सर्वात महत्त्वाची. पवित्र भावनेने डोकं ठेवलं काय किंवा हात जोडले काय, देवापर्यंत आणि अल्लाहपर्यंत त्या नक्कीच पोहोचतात. खूप समाधान वाटतं.

थोडावेळ दर्ग्यात काढायचा. बॅक साइडला जाऊन अरबी समुद्र पाहायचा. किना-यावरुन दिसणारा समुद्र, दर्ग्यातून आणखी वेगळा दिसतो. एकदम वेगळा. दर्ग्याच्या आतून किना-याकडेही आपण एका वेगळ्या अँगलने पाहतो... दर्ग्यातून बाहेर पडताना पावलं आपसूकच हाजीअली ज्यूस सेंटरकडे वळतात. चीज सँडविच, फालूदा किंवा पायनापल ज्यूस आणि सफेद ग्लासातलं बर्फाळ पाणी... उम्मा..!

त्याच रस्त्यावरुन पाच मिनिटं चाललो की, आपण महालक्ष्मी मंदिराच्या दारात. दहा-पंधरा रुपयांचे दाणे घेऊन ते कबुतरांना खाऊ घालायचे. तिथून चालत आत मुख्य मंदिराच्या दिशेने जायचं. दोन्ही बाजूला हारफुलं आणि पेढेवाल्यांची दुकानं सजलेली असतात. फुल-प्रसादाची थाळी घ्यायची. चपला स्टॉलवरच काढायच्या. एव्हाना गळ्यातला दुपट्टा तिने डोक्यावरुन घेतलेला असतो. आपण नुसतं मागून मागून चालायचं. फार तर तिची पर्स सांभाळत. पाय-या चढून मंदिराजवळ पोहोचल्यावर तिचा आणि आपला मार्ग वेगळा होतो. म्हणजे ती महिलांच्या रांगेत आणि आपण पुरुषांच्या. शुक्रवार, गुरुवार असेल तर जास्त गर्दी असते. पुरुषांची रांग भरभर संपते, पण बायकांचं खूप काही मागायचं असतं, देवीकडे..! सगळ्याजणींना देवीची ओटी भरायची असते. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावरही ओठांची पुटपुट सुरुच असते. सवयीप्रमाणे काहीतरी मागायचं राहूनच जातं... प्रदक्षिणा घालता घालता त्या विसरलेल्या यादीची उजळणी सुरु होते. त्या नादात आपल्यापेक्षा तिच्या दोन प्रदक्षिणा जास्तच होतात...

देवीचं दर्शन झाल्यावर अजिबात परतायची घाई करायची नाही. मंदिराच्या आवारातल्या बेंचेसवर बसायचं. ती ताटातले फुटाणे आणि पेढा आपल्या हातावर ठेवते. आपण त्यातलाही थोडासा पेढा तिला भरवायचा… तिला झालेला आनंद, मिळालेलं समाधान तिच्या डोळ्यात दिसू लागतं. शब्दांपेक्षा तिचे डोळेच घडाघडा बोलू लागतात... तिथे शांत बसायचं. अगदी शांत. सीसीटीव्हीमधल्या महालक्ष्मीकडे पाहत... वीसेक मिनिटांनी तुमची ती स्वतःच तुम्हाला खूण करेल, उठायची. तेव्हाच उठायचं. कळलं..?

मित्रांनो, एकदा हा प्रयोग करुन बघाच. तुमची देवी तुम्हाला हमखास प्रसन्न झालीच म्हणून समजा..!

- सुनील घुमे

Wednesday, September 2, 2009

प्रिय अमुचा एक पार्क हा...

समुद्र आणि गार्डन असा दुग्धशर्करायोग म्हणजे नेपीयन्सी रोडवरचं प्रियदर्शिनी पार्क. पीडीपी...! अरबी समुद्राच्या अगदी काठावर वसलेले हे मोठ्ठालं गार्डन. महत्त्वाचं म्हणजे बाकीची गार्डन सूर्यास्तानंतर बंद होतात. परंतु पीडीपीत मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत कुणीही तुम्हाला हटकत नाही.

हम : बरं बाबा, आज संध्याकाळी जाऊया...
तुम : कुठं? सी फेसला नाहीतर हाजीअलीला? काय रे, तुला दुसरे कुठले स्पॉट सापडत नाहीत?
हम : का? तिथं काय प्रॉब्लेम आहे? मस्त पावसाचा सिझन आहे. खळाळत्या लाटांमध्ये भिजूया...
तुम : मला नाही आवडतं सारखं सारखं समुद्रावर. सगळ्या लाटा आणि खडकही आपल्याला ओळखायला लागलेत. त्यापेक्षा मस्तपैकी एखाद्या गार्डनमध्ये जाऊ. झाडाखाली, हिरवळीवर नाहीतर कट्ट्यावर बसू...
हम : का ती झाडं नाही ओळखणार आपल्याला..?

... आपलंही अनेकदा असं ‘हम-तुम’सारखंच होतं. एकतर उघड उघड भेटायची बोंब. त्यात भेटलो तर ‘कुठं कुठं जायचं ...’ याच्यावरच निम्मावेळ खर्ची पडतो. त्याला समुद्रावर फिरायचं असतं, तर तिचा हट्ट गार्डनसाठी. ‘हम-तुम’च्या या प्रॉब्लेमवर एक सोल्यूशन आहे… प्रियदर्शिनी पार्क!

समुद्र आणि पार्क असा दुग्धशर्करायोग म्हणजे नेपीयन्सी रोडवरचं प्रियदर्शिनी पार्क. पीडीपी...!

ब्रीच कॅन्डी किंवा केम्स कॉर्नरवरुन नेपीयन्सी रोडने मलबार हिलला जाताना उजव्या हाताला असलेला हा प्रियदर्शिनी पार्क. मलबार हिलवर राहणा-या आणि तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या गर्भश्रीमंतांचा हा जॉगिंग पार्क. इंदिरा गांधी यांच्या नावावरुन तो प्रियदर्शिनी पार्क म्हणून ओळखला जातो. अरबी समुद्राच्या अगदी काठावर वसलेले हे मोठ्ठाले गार्डन. गार्डनमध्ये बसून समुद्राच्या लाटांचा आनंद लुटायचा, तर पीडीपीसारखी चांगली सोय नाही. महत्त्वाचं म्हणजे बाकीची गार्डन्स सूर्यास्तानंतर बंद होतात. परंतु पीडीपीत मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत कुणीही तुम्हाला हटकत नाही.

वेल मेन्टेन्ड अशा या पार्कात एन्ट्रीसाठी अजिबात फी नाही. आत शिरलं की, उजव्या बाजूलाच पुष्कळ बेन्चेस असतात. पंजाबी ड्रेस आणि पायात स्पोर्टस् शूज अशा वेषातील आज्जी आणि शॉर्टस-टी शर्टस् घातलेले आजोबा पाय मोकळे करायला टॉवरमधून खाली उतरलेले असतात. पीडीपीला एखाद-दुसरा राऊंड मारल्यानंतर या बेंचेंसवर या ज्येष्ठ नागरिकांची मिटिंग भरलेली असते. त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. एकतर तिथून सरळ रेषेत चालत मधले मैदान क्रॉस करुन थेट समुद्रकिनारी जाता येतं किंवा उजव्या बाजूपासून सुरु झालेल्या जॉगिंग ट्रॅकवरुन प्रेमी कपल्सना आपली पदयात्रा सुरु करता येते. पीडीपीला एक राऊंड मारायचा झाला तरी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. थकायला झालं तर समुद्र किना-यालगतच्या बेंचवर किंवा दगडांवर, नाहीतर सरळ वाळूत जाऊन बसायचं. ज्यांना खडकांमध्ये बसायला आवडतं, त्यांना तोही ऑप्शन आहे. अरबी समुद्रात बुडणा-या सूर्याला साक्षी ठेवून प्रेमी कपल्सच्या अनेकविध गुजगोष्टी इथं रंगतात...

पीडीपीमधला फेव्हरेट स्पॉट कुठला असेल तर इथलं माडांचं आर्टिफिशियल बन. या लँडस्केप बागेची रचनाच एवढ्या कल्पकतेने करण्यात आली आहे की, हॅटस ऑफ टू देम... माडांच्या झावळ्यांमधून दूरवरचा समुद्र पाहताना आपण एखाद्या चित्रकाराची कलाकृतीच पाहतोय, असा फिल येतो. विशेषतः सूर्यास्तानंतरची रात्रीची लाईटसची रचना वातावरण आणखी रोमँटिक बनवते. काळोख पडल्यानंतर जॉगिंग ट्रॅकच्या मध्यभागी पसरलेल्या हिरवळीवर पहुडण्याचा एक्सपिरीयन्स शब्दांत वर्णन करताच येणार नाही. दिवेलागणीच्या वेळी पीडीपीच्या तिन्ही बाजूला असलेले गगनचुंबी टॉवर दिव्यांनी लुकलुकायला लागतात. एखाद्या तोरणासारखे..!

शेजारी बसलेली ती एका सी फेसिंग बाल्कनीकडे बोट दाखवते आणि म्हणते... मला ते घर हवंय. देशील? आपण जागच्याजागीच उडतो. सा-या यष्ट्या भुईसपाट होतात. एकदम क्लिन बोल्ड...

साडेसात वाजताची वेळ.. इव्हनिंग वॉकवाली मंडळी कमी झालेली असतात. पुढचा एक तास प्रेमी कपल्ससाठी ‘मोकळे मैदान’ असतो. जॉगिंग ट्रॅकवर सुरक्षित अंतरावरुन चालणारी कपल्स एकमेकांच्या बाहुपाशात विसावतात. मोकळ्या आकाशात चांदण्यांचा आणि मोकळ्या पार्कामध्ये कपल्सचा खेळ रंगलेला असतो. एवढ्यात साडे आठ वाजतात... सिक्युरिटी गार्डसच्या शिट्ट्या पार्कामध्ये घुमू लागतात. ‘चलो, बाहर चलो’चा गजर कानावर पडतो. झाडांच्या कुशीतून पाना-फुलांनी बाहेर पडावं, तशी एकेक कपल्स बाहेर येऊ लागतात.

पार्काच्या गेटजवळच्या स्टॉलवर आइस्क्रीमची ऑर्डर दिली जाते. विरघळणारी आइस्क्रीम कपड्यांवर सांडणार नाही, याची काळजी घेत हम आणि तुम नेपीयन्सी रोडवरच्या गर्दीमध्ये विरघळून जातात...

- सुनील घुमे