गोरेगावच्या पूर्वेला आरे कॉलनीत असलेला बोटिंग क्लब. मुंबईत हाच काय तो एकमेव बोटिंग क्लब उरलाय आता. खिशाला परवडेल अशा भाड्यात बोटिंगचा मनमुराद आनंद इथं लुटता येतो...
Row, row, row your boat,
Gently down the stream
Merily, merily, merily, merily
Life is such a dream…
सिनिअर केजीतला शार्दूल मोठ्याने स्कूलमध्ये नव्याने शिकवलेली पोएम म्हणत होता...
मीही त्याच्या मागून त्याच ओळी गुणगुणायला लागलो...
एक बोट. पाण्याचा प्रवाह कापत पुढं पुढं निघालेली. बोटीत फक्त तो आणि ती. आनंदाने बोट वल्हवत निघालेत... कुठं जायचंय, काहीच माहित नाही... किती वेळ झालाय, ठाऊक नाही. बोट चाललीय, चाललीय... सुंदर स्वप्न डोळ्यासमोर तरळू लागलं...
आणि अचानक आठवलं... अरे, हे तर आपलं आरे गार्डन...
गोरेगावच्या पूवेर्ला आरे कॉलनीत असलेला बोटिंग क्लब. मुंबईत हाच काय तो एकमेव बोटिंग क्लब उरलाय आता. एरव्ही बोटिंग बिटिंग म्हणजे आपल्यासाठीच स्वप्नच. फार तर सिनेमाच्या गाण्यातलं लोकेशन. (आठवलं दिल दिवाना बिन सजना के माने ना...) मुंबईबाहेर महाबळेश्वर किंवा तापोळ्याला गेलो तर रग्गड पैसे मोजून बोटिंगची हौस भागवून घ्यावी लागते. पण आरेतले वारेच काही न्यारे... म्हणजे मुंबईतल्या मुंबईत, खिशाला परवडेल अशा भाड्यात, हिरव्यागार गच्च जंगलाच्या सान्निध्यात, बोटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची हमखास जागा म्हणजे हा बोटिंग क्लब.
आम्ही सकाळी सव्वा आठ वाजताच तिथं पोहोचलो होतो. गोरेगाव स्टेशनवरून रिक्षा केली आणि आरे गार्डनला आलो. राज्य सरकारची आरे ही दुधाची डेअरी इथं आहे. गोरेगावहून जंगलातून वाट काढत जाणाऱ्या या रस्त्याने थेट पवईला जाता येतं. पण वाहनाने जायचं तर दहा रुपयांचा टोल मोजावा लागतो. आम्ही आरेच्या जंगलात शिरलो तेव्हा सकाळचं प्रसन्न वातावरण होतं. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरचा गजबजाट दोनच मिनिटात लुप्त झाला. सूर्याची सोनेरी, कोवळी उन्हं पाना-फुलांचा अडसर दूर सारत डांबरी रस्त्यापर्यंत पोहोचत होती. पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज ऐकू येत होते. मधूनच एखाददुसरे वाहन रस्त्यावरून पास होत होते. पायी चालणारे अनेकजण दिसत होते. आम्ही बोटिंग क्लबच्या गेटजवळच रिक्षा सोडली.
समोरच्या तळ्याचा अर्धा भाग सोन्यासारखा चमचमत होता. आणि अर्धाअधिक भाग झाडांची सावली पांघरूण अजूनही दुलईतच होता. बोटिंग क्लबच्या काठावर पंधरा-वीस बोटी पाण्यावर अलगद तरंगत होत्या. तिकीट काऊंटर अजून उघडलेलं नव्हतं. एक माणूस आतमध्ये काहीतरी करत होता. दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथंच घुटमळत असल्याचं पाहून त्यानंच येऊन विचारलं. बोटिंग करने का है क्या... आम्ही एकदम खूष झालो. गेट उघडून त्यानं आम्हाला आत घेतलं. इतनी जल्दी हम गेट खोलता नही... पण अभी तुम आ गया है तो जाओ... तो म्हणाला. कितना पैसा होगा, भाईसाब... मी आपला मराठी बाणा जागवला. अरे जाओ बाबा... सोच समझ के दे देना... त्यानंही पक्क्या मुंबईकरासारखं उत्तर दिलं. त्यादिवशीची बोटिंगची बोहनी आम्हीच केली.
आधी आम्ही वल्हे मारण्याची बोट घेतली. पण घंटा... तीन-चार मिनिटं झाली तरी बोट जागची हलेचना. म्हणजे मी वल्हा मारला की, ती थांबायची आणि तिने मारला की, मी थांबायचो. बोट तिथल्या तिथंच गोल गोल फिरत होती. शेवटी तो मघाचाच देवदूत पुन्हा धावून आला. वो आपका काम नही... ये पॅन्डलवाला बोट आप ले लो... असं फर्मान त्यानं सोडलं. आम्ही दुसऱ्या बोटीत येऊन बसलो....
त्यानंतरच जवळपास दीड-दोन तास आम्ही तळ्यात होतो. नऊनंतर आमच्यासारखीच आणखी काही प्रेमी कपल्स सोबतीला आली. पण पहिला अर्धा-पाऊण तास आम्ही दोघंच बोटिंगचा आनंद लुटत होतो. आयुष्यात पहिल्यांदाच बोटिंग करत होतो. सायकलसारखं पॅन्डल मारायचं आणि उजव्या हातानं मागची दांडी राइट-लेफ्टला अॅडजस्ट करायची. पाचेक मिनिटातच जमलं बुवा. त्या सुंदर तळ्यात बोटीत आम्ही दोघंच... थोडी धाकधुकही होतीचं. च्यायला, मध्येच बोट उलटली तर... इथं स्विमिंग कोणाला येतंय, बोंबलायला... मनातला शंकासूर डोकं वर काढून काढून रंगाचा बेरंग करत होता. तळ्याच्या मध्यभागी असतानाच सापासारखं काहीतरी हिरवं हिरवं बोटीच्या बाजूने पाण्यातून सरसरत गेलं. चर्रर्रर्र... झालं काळजात. पण ती सोबत होती. मग कसला डर... जीना यहाँ, बुडना यहाँ...
मस्त मज्जा आली. एकदम यादगार, रोमँटिक बोटिंग. तेव्हा मोबाईल नव्हता, नाहीतर छानपैकी फोटो सेव करून ठेवला असता... ऊन वाढू लागलं तसं आम्ही तळ्याकाठी आलो. मघाचा माणूस कुठं दिसंना. पाचेक मिनिटं वाट पाहिली. तो आला. त्याच्या हातावर शंभराची नोट ठेवली... तोही खूष झाला. वापस आना साब... म्हणत त्यानं नोट वरच्या खिशात सरकवली.
तिथून चालतच आम्ही वरच्या बाजूला असलेल्या छोटा काश्मीर गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी समोरच्या स्टॉल्सवर शेवपुरी आणि थम्स अपसह पोटोबा केला. एरव्ही हिंदी-मराठी सिनेमात दिसणारं छोटा काश्मीर आज प्रत्यक्ष पाहत होतो. अनेक हिरॉईन्स जिथं मनसोक्त बागडल्या (खरं तर लोळल्या...) ती हिरवळ तुडवत आम्ही चाललो. सुंदर फुलझाडं, उंचच उंच वृक्ष, लता-वेली आणि पायऱ्यापायऱ्यांच्या उतारावरची गारेगार हिरवळ... एक बर्फ सोडला तर काश्मीर याहून नक्कीच वेगळा नसेल, याची खात्री पटली. आजूबाजूला फॅमिली क्राऊड, बच्चेकंपनी तर दिसत होती. पण प्रेमी कपल्स काही नजरेला पडेनात. आपल्या समोरच गार्डनमध्ये शिरलेली कपल्स गेली कुठे, असा प्रश्न पडला होता. दहा-पंधरा मिनिटांनी जेव्हा आम्ही गार्डनच्या मध्यावरील हाऊसवजा कुटीच्या पलीकडे पोहोचलो, तेव्हा उत्तर सापडलं. सगळी कपल्स झाडाझुडपांच्या कुशीमध्ये, ओबडधोबड दगडांवर, पायऱ्यांवर, पायवाटेवर, अगदी जागा मिळेल तिथं पहुडली होती. अनेकांची प्रेमाराधना ऐन रंगात आली होती. या दुनियेचे पाश तोडून त्यांची केव्हाचीच ब्रह्मानंदी टाळी लागली होती. कुणीतरी स्टॅच्यू केल्यासारखं काहीजण समाधीस्थ झाले होते. छोटा काश्मीर नव्हे, छोटा स्वर्गच इथं अवतरल्यासारखं भासत होतं.
या प्रेमयज्ञात आम्हीही आमच्या वाट्याची थोडी समिधा टाकली... आणि दुपारनंतर आरेच्या स्वर्गातून पुन्हा जमिनीवर आलो...
- सुनील घुमे
Tuesday, October 13, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment