Wednesday, October 14, 2009

रात्रीस खेळ चाले...

नवरात्रीच्या दांडियामध्ये टिपरीला टिपरी भिडवताना ‘नैन लड गयी है...’ होऊन जातं आणि गरब्याचा फेर धरता धरता पावलं सप्तपदीकडं आपसूक वळतात... पण फ्रेन्डस, नवरात्रीच्या सगळ्याच रात्री सारख्या नसतात...


लोच्या झाला होता...
इज्जतचा भाजीपाला व्हायचीच वेळ आलेली...
नवरात्रीचा पहिला दिवस... संध्याकाळचे सात वाजलेले आणि ज्यांना सुपारी दिली होती, त्या बॅन्जो पार्टीने आयत्यावेळी टांग दिलेली... करायचं काय? गुरूने पहिल्यांदाच दांडियाची जबाबदारी स्वखुषीने अंगावर घेतली आणि ही नस्ती आफत ओढवली.
... पण गुरूचा खरा लोच्या भलताच होता. त्याच्या छोट्या बहिणीसोबत एम.डी. कॉलेजमध्ये शिकणा-या मंदाकिनीला त्यानं दांडियाला बोलावून घेतलं होतं. लाल-हिरव्या चनिया चोलीमध्ये काय सॉलिड दिसत होती ती. ब-याच दिवसापासून मंदाकिनीवर इम्प्रेशन मारण्याची संधी गुरू शोधत होता. पण बॅन्जोवाल्यांनी त्याचा गेम केला होता...
... तरीही रात्री दांडियाचा प्रोग्राम झक्कास झाला. एका डीजेवाल्याला कसाबसा पकडून आणला आणि दांडियाची गाणी वाजवून पोरं-पोरी रात्रीपर्यंत तुफान नाचले. ढिंकी चिकीन ढिंकी चिकीन... डीजेचे वरचे सगळे पैसे गुरूने एकट्याने भरले.
शिवाय बेस्ट ड्रेसचं 500 रुपयांचं बक्षीस मंदाकिनीला देण्यात आलं ते वेगळंच...
....................

आठ वाजल्यापासूनच मिनलची घरात चुळबुळ सुरू होती. कधी एकदा नवा ड्रेस घालून खाली दांडियाला जाते, असं झालं होतं. छानच होता तिचा ड्रेस. सगळ्या पाठीवर एक्स एक्स एक्सचं नक्षीकाम... आणि अगदी सहजपणे दिसेल असा चमकीदार रंगीबेरंगी मोराचा टॅटू... नाचे मयूरीचं जणू... सगळ्या दांडियाचं स्टार अट्रॅक्शन होती ती.
रात्री साडेबारापर्यंत दांडिया रंगला... पोलिस आले आणि स्पीकर बंद करायला लावला. आता काय करायचं? पावभाजीचा बेत ठरला. वीसेक जणांची वरात केईएमसमोरच्या ‘आदिती’मध्ये जाऊन धडकली. आदिती स्पेशल पावभाजी आणि थम्स अपची ऑर्डर.... ऑर्डर आली आणि गोपाळ उभा राहिला. आजचं सगळं बिल मी देणार, अशी अनाऊन्समेंट केली त्यानं. सगळे बेशुद्ध होण्याची वेळ. मग त्यानेच रहस्यस्फोट केला...
जाधवांच्या मिनलची विकेट पडली होती... कॉट अॅन्ड बोल्ड गोपाळ भालेकर..!
......................

अपर्णा आणि संगीता. जीवश्च कंठश्च मैत्रिणी. दांडिया खेळायला त्या एकदम खाली उतरायच्या. पण दांडिया सुरू झाला की, संगीता मध्येच गायब होते, असं अपर्णाच्या लक्षात आलं. चार-पाच दिवस हा खेळ सुरू होता. सहाव्या दिवशी अपर्णाचं सगळं लक्ष संगितावरच होतं. संगिताला तिनं अमोलसोबत जिन्यांकडे जाताना पाहिलं... मध्येच हे दोघे कुठं चालले? पाणी प्यायला..? अपर्णाही त्यांच्या मागोमाग निघाली. पाच मजले वर चढली तेव्हा तिला सगळा प्रकार लक्षात आला.... दांडिया रंगात आला की, हे दोघे गच्चीवर यायचे. गच्चीची चावी अमोलकडे असायची. काळोख्या गच्चीमध्ये हे दोघंच. रात्रीस यांचा वेगळाच खेळ चाललेला...
.......................

नवरात्रीच्या सीझनमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्याच बिल्डिंगमध्ये असाच माहौल तर असतो. टिपरीला टिपरी भिडवताना ‘नैन लड गयी है...’ होऊन जातं आणि गरब्याचा फेर धरता धरता पावलं सप्तपदीकडं आपसूक वळतात. किती ‘गुरू’ आणि किती ‘मंदाकिनी’ या नवरात्रीच्या उत्सवात पहिल्यांदाच भेटतात आणि नंतर कायमचे एकमेकांचे होऊन जातात...
................

बट फ्रेन्डस... नवरात्रीच्या सगळ्याच रात्री सारख्या नसतात...
शीतलसारख्या कमनशिबी मुलींच्या वाट्याला काही काळरात्रीही येतात....
कॉलेजमधल्या ग्रुपसोबत एका मोठ्या दांडियाला जातेय, असं सांगून ती रोज रात्री आठ वाजता घराबाहेर पडायची ती पहाटे तीन-चारलाच घरी परतायची. दांडियाच्या तिकिटासाठी पप्पांकडून करकरीत नोटाही न्यायची. लाडात वाढलेल्या शीतलला कुणी कधीच हटकलं नाही. आणि शेवटी नको तेच झालं... कॉलेजमध्येच सिनिअर असलेला तिचा एक मित्र आणि ती रोज या काळात ‘जीवाची मुंबई’ करत होते. कधी मित्राच्या घरी, कधी लॉजवर... त्यातून शीतल प्रेग्नंट झाली... शीतलच्या मित्राने सरळ हात वर केले. या प्रकाराने तिच्या वडिलांनी हाय खाल्ली... वेळीच लक्षात आलं म्हणून अॅबॉर्शन तरी करता आलं...
.................

नवरात्रीसारखे उत्सवच असतात मुळी आनंदाची लयलूट करण्यासाठी...
परंतु मज्जामस्ती करताना जवानी ‘दिवानी’ होणार नाही, याची खबरदारी आपली आपणच घ्यायला हवी!

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment