Saturday, August 8, 2009

क्युपिड पार्क!

बच्चे कंपनीसाठी बालोद्यान असतं, आजी-आजोबांसाठी नाना-नानी पार्क असतं, तसं युथ जनरेशनसाठी एखादं क्युपिड पार्क का नको? जिथे फक्त आणि फक्त प्रेमाचंच अधिराज्य असेल...

'जे लाहोर नही देख्या, ते नहीं जन्म्या...' अशी पंजाबी म्हण आहे. अगदी त्याच तालावर जिसने शिवाजी पार्क नही देख्या, वो लव्हरच नही... असं विधान आपण करू शकतो.

शिवाजी पार्कात एकदाही पाय ठेवला नाही, असा मुंबईकर आशिक शोधून सापडणार नाही. जशी क्रिकेटची, तशीच शिवाजी पार्क म्हणजे प्रेमाचीही पंढरी. दिवसाचे २४ तास, विशेषत: सूर्य मावळल्यानंतर इथे प्रेमाचा ऊरुसच भरलेला असतो. पार्कातील हिरवळ, कट्टा, ज्ञानेश्वर गार्डन ते अगदी अरबी समुदाच्या काठापर्यंत प्रेमरसात आकंठ बुडालेले प्रेमवीर पावलापावलावर भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दादरसारख्या मध्यवतीर् भागात पाय रोवून उभं असलेलं हे ऐतिहासिक मैदान. ते प्रसिद्ध आहे, इथे भरणाऱ्या लाखो-लाखोंच्या राजकीय सभांसाठी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणांनी आणि सचिन तेंडुलकरने आपल्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने शिवाजी पार्क गाजवलं. तेच मैदान यच्चयावत प्रेमी कपल्ससाठी हक्काचं व्यासपीठ बनलंय... क्युपिड पार्क.

सकाळचा सूर्य उगवण्याआधीच प्रेमाची पाखरं इथं किलबिलाट करू लागतात. सकाळी जॉगिंगला आलेल्यांएवढीच प्रितीच्या फुलपाखरांची गदीर् कट्ट्यावर दाटलेली असते. कॉलेजचं लेक्चर बंक करून आलेली तरुण कपल्स इथे दुसऱ्याच अभ्यासाला भिडलेली असतात. उन्हं डोक्यावर येतात तशी गदीर् वाढायला लागते. संध्याकाळी पार्कात जत्राच भरलेली असते. कट्ट्यावर शोधूनही जागा सापडत नाही. बच्चे कंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा कट्टा ठरलेला असतो. त्यांच्या जागेवर आपण बसलो तर नको नको ते टोमणे ऐकावे लागतात. अशावेळी प्रेमी कपल्सना आधार देते ती मैदानातील हिरवळ.

दादर स्टेशन, प्लाझा, शिवाजी मंदीर, शिवसेना भवन, जिप्सी, माँसाहेबांचा पुतळा... या जागा म्हणजे कपल्सचे मीटिंग पॉइण्ट्स. सूर्य मावळतीला डोकावू लागला की, प्रेमी कपल्सची पावलं चालती पार्काची वाट अशी अवस्था होऊन जाते. जोडीदाराचा हात धरुन आधी उद्यान गणेशाचं दर्शन घ्यायचं... बाप्पाचा प्रसाद मिळाला की, पार्कात हिरवळीवर मोक्याची जागा पकडायची. क्रिकेटच्या पीचची चहुबाजूंनी नेट लावलेली जागा म्हणजे सोने पे सुहागा... एव्हाना पार्कात अंधाराचं राज्य पसरलेलं असतं. ज्या पीचवर दिवसा क्रिकेटची नेट प्रॅक्टिस चालते, तिथे वेगळीच प्रॅक्टिस रंगलेली असते. रात्रीस खेळ चाले... असं मस्त भारलेेलं वातावरण इथे असतं. अवघ्या पार्कावर क्युपिडचं (अर्थात प्रेमदेवतेचं) अधिराज्य सुरू झालेलं असतं. रात्री दहा-साडे दहा वाजेपर्यंत ही नाइट मॅच संपते आणि सभ्य प्रेमी कपल्स आम्ही त्या गावचेच नाही, अशा आविर्भावात आल्या वाटेने माघारी परततात. परंतु रात्री अकरानंतर पार्कात जे काही सुरू असतं, त्याची इथे वाच्यताच न केलेली बरी. चंपी, मालिशपासून ते कुणाही सुसंस्कृत माणसाच्या अंगावर काटा येईल, असे अश्लील आणि बिभत्स प्रकार तिथे चालतात.

कल्पना करा की, उद्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय... चित्रपटाचा सिक्वल म्हणून कुणी मी शिवाजीराजे भोसले पाहतोय... असा चित्रपट काढला तर?

हाच खेळ चौपाटीवरही अहोरात्र चाललेला असतो. महापौर बंगल्यापासून कीतीर् कॉलेजपर्यंत पसरलेली किनाऱ्याची भिंत. या भिंतीला खेटून दुपट्ट्याच्या आड, छत्रीचा आडोसा घेऊन, प्रेमाच्या नावाखाली अगदी किळसवाणे चाळे सुरू असतात. समुदाला भरती असो नाहीतर ओहोटी, किनाऱ्यावर बसलेल्या या जोडप्यांच्या प्रणयाला (?) मात्र कायम उधाण असतं. त्यांच्या या साधनेत भिकारी, तृतीयपंथी आणि आंबट शौकिन पोरांचा कायम उपदव सुरू असतो. त्यामुळे सच्चा प्रेमीजनांनी चौपाटीचं दर्शन थोडं लांबूनच घेतलेलं बरं!

या कपल्सना असं उघड्यावर पडलेलं पाहिलं की वाटतं, या मुंबईत मनसोक्त प्रेम करण्यासाठी एखादी जागा हवीच. बच्चे कंपनीसाठी बालोद्यान, आजी-आजोबांसाठी नाना-नानी पार्क असतं, तसं युथ जनरेशनसाठी एखादं क्युपिड पार्क का नको? विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत... सो पॉलिटिशियन्स, थिंक अबाऊट इट.

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment