Tuesday, August 11, 2009

जंगल में मंगल

पावसाळ्यातली नॅशनल पार्कची सफर हा स्वर्ग असेल, तर बाकीच्या मोसमात स्वर्ग फक्त दोन बोटं उरलेला असतो. ऋतू कुठलाही असो, इथं प्रेमाला आणि प्रेमिकांना सदैव पालवी फुटलेली असते.

टिप टिप बरसा पानी, पानी ने आग लगायी
आग लगी दिल में तो, दिल को तेरी याद आयी...

महिनाभराच्या रुसव्यानंतर पावसाच्या जलधारा कोसळू लागल्यात... पहिल्या पावसाचा गंध सर्वदूर पसरलाय... आषाढसरींनी अख्खा आसमंत चिंब चिंब झालाय... पुन्हा एकदा रान हिरवंगार झालंय... अशावेळी याद येते ती... प्रेयसीची? ती तर कायमच येते हो...

अशावेळी याद येते ती नॅशनल पार्कची...

अहाहा... हिरवंगार, ओलेतं नॅशनल पार्क. (सरकारी भाषेत बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.) प्रेमात पडलेल्या प्रत्येकानेच रिमझिम पावसात भिजत कधी ना कधी नॅशनल पार्क पालथा घातलेला. ज्यांनी हा आनंद लुटला नाही किंवा लुटता आला नाही, त्यांच्यासारखे तेच... कमनशिबी!

बोरिवली पूवेर्ला रिक्षात बसून हायवेवरच्या नॅशनल पार्काच्या दारात उतरायचं. त्याने रिक्षाचे पैसे द्यायचे आणि तिने छत्री उघडून कावऱ्याबावऱ्या नजरेने कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना, याचा कानोसा घ्यायचा. विण्डचिटर घातलेल्या त्याने मग तिच्या लेडीज छत्रीत शिरायचं... डिट्टो राज कपूरच्या 'श्री ४२०'मधला रोमॅण्टिक सीन. 'प्यार हुआ, इकरार हुआ, प्यार से फिर क्यूँ लगता है डर...' पावसाच्या सरी अंगावर झेलत कपल्स नॅशनल पार्कच्या डांबरी रस्त्यावरुन चालू लागतात. छत्री पावसासाठी नसतेच, तिचा उपयोग आडोशासाठीच. तिने डोक्यावरुन ओढणी लपेटायची. मग पावसाचा जोर वाढतो आणि... आणि... अलगद त्याचा हात तिच्या खांद्यावर विसावतो. दोघेही शहारतात... त्यांच्यासारखेच दोन-चारजण पुढेमागे चालत असतात. कुणी झाडाच्या आडोशाने, कुणी ओढ्याच्या काठी विसावलेलंं. एव्हाना पावसाने सर्वांग भिजलेलं असतं. पण छत्री काही बंद होत नाही. थंडीने अंग थरथरु लागतं, पण एकमेकांच्या सहवासाची ऊब तरारी देते.

नॅशनल पार्कमध्ये मनसोक्त फिरता येतं, भटकता येतं. अगदी कुठंही. प्रायव्हसीच्या शोधात असलेल्यांना ती पावलापावलावर सापडते. इथं यायचं म्हणजे एक फायदा असतो. कुणीही ओळखीचं सहसा भेटत नाही आणि चुकूनमाकून भेटलं तरी कुणी कुणाला काही सांगत नाही. सब पंछी एक डाल के..! नॅशनल पार्कचं प्रत्येक झाडं, प्रत्येक बेंच, प्रत्येक वाट अन् अगदी प्रत्येक दगड हा प्रेमाचा साक्षीदार असतो. अनेक कपल्सची बसायची जागाही ठरलेली असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मज्जेत वेळ जातो. दुपारी पोटात कावळे काव काव करतात. मग जी हुश्शार असते, ती पर्समधून वेफर्स, कुरकुरे, फरसाण, चिक्की नाहीतर चॉकलेट्स बाहेर काढते. छोटीशी पाण्याची बाटली असतेच. पोरगी गृहकृत्यदक्ष की काय म्हणतात, ती आहे की नाही, याची वधूपरीक्षाही तिथे आपसूक होऊन जाते.

नॅशनल पार्कातला एक रस्ता वनराणी आणि गांधी टोपीकडे जातो. दुसरा रस्ता टायगर सफारीकडे. त्याच बाजूला थोडा पुढे धबधबाही आहे. आणि तिसरा रस्ता कान्हेरी गुंफाकडे जातो. हे तीन स्पॉट म्हणजे खरं तर प्रेमाच्या फुटपट्ट्याच. म्हणजे कसं..? अगदी नवखी कपल्स वनराणी-गांधी टोपीकडे जातात. हा मार्ग एकदम सेफ. थोडी सरावलेली कपल्स टायगर सफारीच्या मागच्या अंगाच्या रस्त्याने धबधब्यापर्यंत पोहोचतात. कुणी पोहोचतच नाहीत, आडवाटेतच त्यांची पावलं अडखळतात. आणि एकदम मुरलेली कपल्स कान्हेरी गुंफाची वाट वाकडी करतात. स्वत:ची बाइक असेल, तर फक्त आणि फक्त कान्हेरी गुंफाच. नॅशनल पार्कमध्ये बाइक असणाऱ्यांना अॅडव्हाण्टेज असतो. वाट्टेल तिथे बाइक थांबवली, मेन स्टॅण्डला लावली की झालं. वाटलं तर बाइकवर, नाहीतर पायवाटेनं झाडाझुडपाच्या आड. बाइक बंद, रोमान्स सुरू... अगदी तासा-दीड तासाची पायपीट करुन कान्हेरी गुंफाची टेकडी गाठणारी साहसी कपल्सही अनेक असतात. या टेकडीवर पोहोचल्यानंतर आपण जणू जंगलाच्या हिरव्या गालिचावर उभे असल्याचा भास होतो. आवडीचं माणूस सोबत असलं की, कान्हेरीचा रस्ता कधी संपतो कळतच नाही. चिंब पावसानं रान आबादानी झालेलं. अशा धुंद हिरव्या रानातली रिमझिम पावसातली ही वारी एकदा तरी अनुभवण्याजोगी.

पावसाळ्यातली नॅशनल पार्कची सफारी हा स्वर्ग असेल, तर बाकीच्या मोसमात स्वर्ग फक्त दोन बोटं उरलेला असतो. ऋतू कुठलाही असो, इथं प्रेमाला आणि प्रेमिकांना सदैव पालवी फुटलेली असते. पण या स्वर्गाच्या वाटेवर काटेही आहेत बरं... विशेषत: अंधार पडल्यानंतर हे जंगल खूपच धोकादायक आहे. अगदी दिवसाढवळ्याही बिबट्यांपेक्षाही हिंस्त्र अशा मानवी पशूंचा इथे मुक्त संचार असतो. जंगल में मंगल करायला आलेल्या प्रेमी कपल्सना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुबाडण्याचे प्रकार सर्रास घडतात. प्रसंगी अब्रूवर आणि जीवावर बेतल्याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळे इथे येणाऱ्या कपल्सनी सातच्या आत घरात हा नियम गाठीशी बांधूनच ठेवावा.

'प्यार किया है, तो इतना डरनाही पडेगा...'

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment