Monday, August 10, 2009

७० mm प्रेम

सिनेमा हॉलच्या अंधारात प्रेमी कपल्स प्रायव्हसी शोधायला सुरुवात करतात. पडद्यावर रणबीर कपूर टॉवेलमध्ये नाचत असतो आणि समोर प्रेमी कपल्सचं कुची कुची रकमा... सुरू असतं. केवळ तेवढ्यासाठीच तर कॉर्नर सीटचे पैसे मोजलेले असतात.


सिनेमावाल्यांचा संप मिटला. नाही म्हणजे त्याचा आनंद आहेच. पण एक कम्युनिटी मात्र नक्कीच खट्टू झाली असेल, लव्ह बर्डसची!

आता का म्हणून काय विचारता... गेले दोन महिने सिनेमा थिएटरमध्ये एकही नवा पिक्चर लागला नव्हता. त्यामुळे सिनेमा हॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये हाऊस फुल्लची बोंबच होती. बॉलिवूडमधील मंदीच्या या काळात खरीखुरी मज्जा झाली, ती या लव्ह बर्डसचीच. कोणत्याही शोला जा, थिएटरचं वाळवंट झालेलं... मग तिथं फुलायचं प्रीतीचं ओअॅसिस!

सिनेमा आणि लव्हर्सचं नातं म्हणजे कसं, एक दुजे के लिए... सारखं. प्रेमावर सिनेमा निघतात आणि सिनेमा बघून लोक प्रेमात पडतात. त्यामुळे सिनेमा हॉलसारखा दुसरा लव्हर्स स्पॉट शोधूनही सापडणार नाही. उन्हातान्हात, पावसापाण्यात, थंडीवाऱ्यात, उघड्या पार्कामध्ये किंवा समुदकिनारी वणवण भटकण्यापेक्षा कूल कूल एसीमध्ये बसून तीन तासांचा सिनेमा पाहणं कधीही बेस्ट. रस्त्यावरुन फिरायचं म्हणजे कुणीतरी पाहील याची भीती. त्यापेक्षा सिनेमा थिएटरमध्ये प्रोजेक्टरच्या मंद मंद उजेडात कसं मस्त मस्त.

प्रेमात पडल्यानंतर आपण सर्वात आधी काय करतो तर एकत्र सिनेमाला जातो. घरापासून लांबच्या थिएटरमध्ये. सोबतीला गर्लफ्रेण्ड असतेच. पण तिनेही सोबतीला आपली छोटी बहीण किंवा शेजारच्या मुलीला आणलेलं असतं. आपण जाईपर्यंत दहा मिनिटांचा पिक्चर गेलेला असतो. श्शी, उशीर झाला ना, असं तिला वाटतं. आपल्याला अजिबात काही वाटत नाही. अंधारात एक एक खुर्ची ओलांडत आपली सीट गाठायची कसरत रोमांचकारी असते. हलकेच आपला स्पर्श तिला होतो. लाइफमधला पहिलावाहिला स्पर्श... अगदी 'काँटा लगा' की काय म्हणतात, तस्सं होऊन जातं. सिनेमा बघताना आपण गप्प असतो, पण स्पर्शाच्या भाषेत बरंच काही बोलून जातो. खरंय ना?

हा झाला सिनेमाचा इण्टरव्हलपर्यंतचा भाग. लेकिन पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त...

हळूहळू सिनेमा थिएटरच्या चकरा वाढतात. सिनेमा हॉलच्या अंधारात प्रायव्हसी शोधायला सुरुवात होते. पडद्यावर रणबीर कपूर टॉवेलमध्ये नाचत असतो आणि खाली प्रेमी कपल्सचं कुची कुची रकमा सुरू असतं. केवळ तेवढ्यासाठीच तर कॉर्नर सीटचे पैसे मोजलेले असतात. कधी कधी प्रेमकैदी एवढे आवारा, पागल, दिवाने होतात की बाजूला फॅमिली किंवा छोटी मुलं आहेत, याचंही भान राहत नाही. प्रेमाची गाडी ओव्हरस्पीडमध्ये धावत असते. लज्जा, संकोच, भीतीची स्टेशनं केव्हाचीच मागे गेलेली असतात.

खरं तर अशा बेधुंद प्रेमींसाठीच अनेक मल्टिप्लेक्सेसमध्ये मऊ मऊ कोचाची सोय उपलब्ध आहे. एकदम फन रिपब्लिक... फ्लॉप, टुकार चित्रपट किंवा मराठी चित्रपटांचे मॉर्निंग शो म्हणजे प्यार में पागल लोकांसाठी स्वर्गच... काही बोटांवरच तर हा स्वर्ग असतो. मराठा मंदीरसारख्या थिएटरमधील 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा ७०० वा विक्रमी आठवडा. आतमध्ये जावं तर सगळ्या खुर्च्या रिकाम्या. कोपरे कोपरे शोधून कपल्सनी आपापलं विश्व तयार केलेलं... पडद्यावरच्या बिचा-या काजोलकडे ढुंकूनही कुणी पाहत नाही. सगळे दिलवाले आपापल्या दुल्हनियाच्या दुनियेत... ना मंदीचं टेन्शन, ना बॉसची कटकट, ना उज्ज्वल भविष्याची चिंता. फक्त टिंग निंग निंग निंग... टिंग निंग टिंग निंग...

परंतु कधी कधी सिनेमा थिएटरमध्ये सॉलिड गोचीही होते. म्हणजे आपण चंमत ग करण्यासाठी जातो आणि आपलीच चकट फू चंमत ग होते. कॉलेजचं लेक्चर बंक करून आलेल्या टोळक्याच्या तावडीत आपण अलगद सापडतो किंवा ऐनवेळी टाइमपास म्हणून साध्या थिएटरमध्ये जातो आणि आधीच टाइमपास करण्यासाठी आलेल्या कुणाच्या तरी जाळ्यात अडकतो. त्यामुळे आवडीच्या माणसासोबत पिक्चरला जाताना सुरक्षितता हा फॅक्टर लक्षात घेऊनच थिएटरची निवड करावी लागते. नाहीतर फुकटचा मनस्ताप होतो.

सिनेमा थिएटरच्या पायऱ्या चढत चढतच आपल्यापैकी अनेकजण लग्नाच्या बोहल्यावर चढतात. सिनेमासारखाच प्रेमी कपल्सच्या आयुष्याच्या पिक्चरचा शेवटही बहुतांशी गोड होतो.

... आणि ज्यांचा होत नाही, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोतच.

- सुनील घुमे

No comments:

Post a Comment